डोळ्यांची शत्रक्रिया व उपचार करण्यासाठी भारतात अनेक सोई सुविधांचा अभाव आहे. जी खाजगी मोठी रुग्णालये आहेत त्यांची फी गरिबांना परवडत नाही. त्यामुळे आम्ही सर्वसामान्य रुग्णांसाठी नेत्रचिकित्सा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ” सेंटर फॉर साईट” या आघाडीच्या रुग्णसेवा संस्थे सोबत विस्तार करत आहोत. त्यामुळे डोळ्यांचे उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील असे लक्ष्मी आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सुहास हळदीपूरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
देशाच्या १५ राज्यांमधील ४० शहरांच्या ८२ केंद्रांवर ३५० पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टर आणि २७०० कर्मचारी सेंटर फॉर साईट्स अंतर्गत कार्यरत आहेत. या माध्यमातून दरवर्षी दहा लाखांहून अधिक रुग्णांना सेवा पुरविली जात आहे. लक्ष्मी आय हॉस्पिटल यांच्या सोबत आता आंही विस्तार केला असून महाराष्ट्रात ९ केंद्र उपलब्ध केली आहेत असे सेंटर फॉर साईटचे अध्यक्ष आणि वैद्यकीय संचालक डॉ. महिपाल सिंग सचदेव यांनी सांगितले.
लक्ष्मी नेत्र रुग्णालय हे पनवेल, खारघर, डोंबिवली आणि कामोठे या चार ठिकाणी २.५ दशलक्षाहून अधिक रुग्णांना सेवा पुरवित आहे. डॉ सुहास हळदीपूरकर यांच्या नेतृत्वाखाली, ४० वर्षांपेक्षा जास्त अनुभवासह या संस्थेने रुग्णसेवेमध्ये नवी ओळख प्रस्थापित केली आहे. यावेळी डॉ. देवेंद्र वेंकटरामणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.